तू फक्त गात रहा!

सळसळत येऊन थेट डंख घेणार्‍या वार्‍याची झुळूक चुकवत, फांद्यांच्या निष्पर्ण अन् काटेरी सुळावर चिकटून राहणार्‍या वाळक्या पानाची धडपड पाहताना सरसरत अंगावर उभा राहणारा शहारा खूप खोलवर शिरू लागलाय आता, आत आत अगदी थेट ह्रदयात. सुरकुतलेल्या चेहर्‍यावरील खोलवर गेलेल्या डोळ्यांसमोर नाचणारी संध्याछाया, नाचू लागलीय वाटेवर; झाडाच्या पाराभोवती.

जगाच्या रंगभुमीवरील मायानगरीत जागलेली साखरस्वप्ने अस्तास जाताना, अश्रूंच्या सागरात लालबुंद रडवेले डोळे लपवत गुडूप होणार्‍या सुर्यात दिसू लागतं स्वत:चंच प्रतिबिंब. समोर धडपड वाळक्या पानाची.

हिरवकंच स्वप्न घेऊन अंकुरलेल्या त्याचा कोवळा जीव वास्तवाच्या वैशाखात पोळून पिकलेला. रणरणत्या उन्हाच्या चटक्यांत, वाटेवरच्या सार्‍याच सवंगड्यांची साथ सुटलेली. एकटंच फडफडत होरपळणारं आयुष्य.

खूप दाट सावली होती कधीतरी याच फांदीवर. उन्हं सुा कवडसा होऊन दबकत भेटायला येणारी. आभाळातून टपटपणारे इवले इवले थेंब, चिंब भिजविण्यासाठी. अंगावरून मोरपिस फिरत रहावं तसे हुळहुळणारे दिवस.

भूतकाळच तो! ’जहॉं डाल डाल पर सोनेकी चिडियॉं करती है बसेरा’ असे इतिहासाचे गाणे गाणार्‍या देशात जर जागोजागी दहशतीच्या टापा ऐकू येतात पुढच्याच पर्वात, तिथे आपलं हे आयुष्य तर कवडीमोलाचं. कुणीही सहज खुडावं असं.

मोहरण्याच्या त्या दिवसांतील स्वप्नं, आता काळजातल्या जखमा होऊन भळभळत आहेत. खूप वेदना होत आहेत अंतरात.

नाही! वैशाखाच्या त्या चटक्यांची मुळीच पर्वा नाही या जीवाला. पण कालचा दबकत येणारा कवडसा आज संधी साधून आग ओकतोय ना!, याचं खूप खूप वाईट वाटतंय जीवाला. कालचा मोरपीसी गारवा आज खुडायला निघाला आहे, याचं दु:ख दाटलंय. आणि कालचे माझेच सोबती, माझा आजचा फांदीवरचा फडफडाट पाहून टाळ्या पिटत नाचत गिरक्या घेत आहेत, याचं सखेद आश्चर्य.

परिवर्तनाचं हे अनाकलनीय पर्व, दाही दिशांनी वाकुल्या दाखवत नाचतंय; माझ्याच शोकगीताच्या तालावर. पण तरीही हरकत नाही माझी. त्या पानांचं तरी ऐकायलाच हवं मला. आमच्या  दोघांच्याही ह्रदयाच्या तारा तशा एकाच सुरात झंकारणार्‍या.

त्या पानाचा फडफडाट चौकटबंद करून कित्येकांनी मिरवलंय स्वत:च्या कलेचं कौशल्य. आणि माझ्या आर्त संगिताच्या पार्श्वभूमीवरही अनेकांनी रंगवलाय स्वत:च्या अभिनयाचा साज. म्हणूनच आमचं दु:खही काही अगदीच निरर्थक नाही. जगण्याचा आमचा संघर्ष ही कित्येकांना एखाद्या छान जमलेल्या कादंबरीसारखा रिझवतो आहे. कित्येकांची करमणूक करतो आहे. तेवढीच जनसेवा आमच्या हातून.

न जाणो! कदाचित असंही होईल, कुणा अशाच वावटळीत सापडलेल्या जीवाची नजर पडेल आमुच्या आयुष्यावर. आणि त्यालाही प्रेरणा मिळेल संघर्षाची. म्हणूनच थरथरत्या हातांवरच्या फडफडणार्‍या कबुतराच्या चोचीत चिठ्ठी देऊन आम्ही सांगत राहतो एकमेकांना, ’तू फक्त गात रहा! तू फक्त गात रहा!’

– सृष्टी गुजराथी

Advertisements

गुलाम

आकाशात दाटलेले मळभ
अलगद उतरते मनात
आणि कातर कातर संध्याकाळी
काहूर माजते काळजात
तेव्हा कुठे उमजू लागते आपल्याला
एरव्ही निसर्गावर मात करण्याची
वल्गना करणारे आपण सारे
त्याच एका नैसर्गिक भावनेचे गुलाम
ज्याला आपण प्रेम म्हणतो बहुधा!!!!